पंढरपूर तालुक्याच्या ऊस पट्ट्या सुपारी लागवडीचा शिरकाव

.

पंढरपूर : तालुक्यास उजनी धरण व नीरा कालव्याचे पाणी मिळत असल्याने अनेक गावात उसाची लागवड करण्यात आली आहे. सुमारे ३० हजार हेक्टरवर ऊस लागवड आहे. आता उसाच्या पट्ट्या सुपारी व बांबू पिकाने शिरकाव केला आहे. बांबू लागवडीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अाश्वासन शेतकर्‍यांना मिळाले आहे. तालुक्यातील सरकोली गाव पर्यटनस्थळ बनविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पंढरीत आलेले भाविक सरकोली येथील पर्यटनस्थळास भेट देणार आहेत. यातून आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
बांबू विकास महामंडळाचे अध्यक्ष आ.पाशाभाई पटेल यांनी नुकतीच सरकोली गावास भेट दिली. यावेळी रयत क्रांतीचे नेते दिपक भोसले व पदाधिकारी उपस्थित होते. पटेल त्यांनी गावाची पाहणी केली. येथील वातावरण बांबू लागवडीस उत्तम असल्याचे सांगितले. बाजारात बांबूस मोठ्या प्रमाणावर मागणी असून ८ ते १० रुपये किलो दराने विक्री होते. बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येत आहेत. यास चांगली मागणी आहे. बांबू लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. बांबूवर कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही. यामुळे शेतकर्‍यांना भिती वाटण्याचे काम नाही. सरकोली पर्यटनस्थळ व्हावे म्हणून ग्रामस्थ विविध प्रकारच्या झाडांची लागवड करीत आहेत.पर्यटकांना निवासाची सोय व्हावी म्हणून बांबूच्या झोपड्या तयार करण्यात याव्यात अशी सूचना आ.पाशा पटेल यांनी केली.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज ५० ते ६० तर यात्रा कालावधीत लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. येथे आल्यानंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविता यावा म्हणून सरकोली येथे पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन आ.पटेल यांनी दिले.
पंढरपूर तालुक्यास उजनी व नीरा कालव्याचे पाणी मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला लागवड केली आहे. राज्यात सर्वाधिक ३८ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. यात पंढरपूर तालुक्यात ३० हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या ऊस लागवडीचा खर्च वाढला आहे. कारखान्यांकडून लवकर रक्कम मिळण्याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी ऊस पिकांपासून लांब चालला असून आता जास्त रक्कम मिळणारे पिक सुपारी व बांबू लागवडीकडे  वळला आहे.
उसाच्या पट्ट्या आता सुपारी व बांबू पिकाने शिरकाव केला आहे. या पिकांपासून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच पर्यटनस्थळ झाल्यास पर्यटक वाढून गावात विविध प्रकारच्या व्यवसायास चालना मिळणार आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल  होणार आहे.