प्रस्तावित पंढरपूरच्या कॉरिडॉरला खा स्वामींचा विरोध:;लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार !


.
पंढरपूर : कॉरीडॉरला पंढरपुरातून विरोध होत असताना आता खा.सुब्रमण्यम स्वामी यांनीही विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रे भकास करीत आहेत. ते रावणाची भूमिका बजावित आहेत.कॉरीडॉरला विरोध करण्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे राज्यसभा खा.सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली.
वाराणसी, तिरुपतीच्या धर्तीवर शासन पंढरपुरचा विकास करणार आहे. यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात कॉरीडॉर राबविण्यात येणार आहे. यात रस्ते मोठे करण्यात येणार असल्याने मंदिर परिसरातील दुकाने, घरे, मठ, मंदिरे पाडण्यात येणार आहेत. म्हणून कॉरीडॉरला विरोध होत आहे. मात्र कॉरीडॉर रद्द करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करीत नाही. यामुळे व्यापारी, नागरिक, महाराज मंडळी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉरीडॉरबाबत माहिती देण्यासाठी वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी शिष्टमंडळ घेऊन मुंबई येथे खा.सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेतली. तेव्हा खा.स्वामी म्हणाले, विकासाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्रे वाराणसी, काशी, तिरुपती भकास केली. आता लक्ष तीर्थक्षेत्र पंढरपुरकडे वळविले आहे. पंढरपूर संतांची भूमी आहे. ‘जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’ अशी अाख्यायिका पंढरपुरची आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. येथील पुरातन मठ, मंदिरे यांची जपवणूक होणे गरजेचे आहे. मात्र पंतप्रधान मोदी व महाराष्ट्र शासन विकासाच्या नावाखाली रस्ते मोठे करून भकास करण्याचे काम करीत आहेत.व्यापारी, नागरिकांना त्रास होऊ नये असा विकास आराखडा राबविणे गरजेचे आहे. मात्र पंतप्रधान मोदी घरे, दुकाने, मंदिरे, मठ पाडून विध्वंस करीत आहेत. ते रावणाची भूमिका बजावित आहेत, अशी टिका करून खा.स्वामी यांनी कॉरीडॉरला विरोध करण्यासाठी आपण मैदानात उतरलो असून मुंंबई उच्च न्यायालयात कॉरीडॉरला विरोध दर्शविण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
कॉरीडॉरला गल्लीतून विरोध होत आहेत, आता दिल्लीतून विरोध होऊ लागला आहे. कॉरीडॉर विरोधातील आंदोलनाची धार वाढत आहे.


