सरकारच्या ताब्यातून मंदिर मुक्त करा': जबरदस्तीच्या कॉरिडाँला विरोध - डॉ सुब्रमण्याम् स्वामी


.
*श्रीविठ्ठल मंदिर सरकार नियंत्रण मुक्त करणारच ...व जबरदस्तीचा काॅरीडाॅरही होऊ देणार नाही!*
-डाॅ.सुब्रमण्यम स्वामी
पंढरपूर
मंदिरे ताब्यात घेण्याचा कोणताही अधिकार सरकारला दिलेला नाही.मंदिरे चालवणे हे सरकारचे काम नाही.मंदिरेच काय इतर कोणतेही प्रार्थनास्थळ सरकारला ताब्यात घेता येत नाही.बाकिच्या कोणत्याही प्रार्थनास्थळाला सरकारने हात लावलेला नाही मग हिंदुची मंदिरे सरकारी नियंत्रणाखाली का ? त्यामुळे या अगोदरही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. व आता लवकरच पंढरपुर चे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा सरकारी नियंत्रणातुन मुक्त करणार आणि जबरदस्तीचा कॉरिडॉर होऊ देणार नाही नागरिकांची घरे व संतांच्या धर्मशाळा आपण वाचवू अशी ग्वाही डाॅ.सुब्रमण्यम स्वामी यांनी बोलताना दिली. जगातले सर्वात उत्कृष्ट संविधान भारताचे आहे जे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाख्या महाराष्ट्राच्या ज्या विद्वान महापुरुषाने बनवले.ते संविधान कधीही तुम्हा महाराष्ट्रातल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही. त्याच आधारे मी तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विठ्ठल मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे व उद्धस्तीकरण करणारा काॅरीडार रद्द करणे या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यासाठी पंढरपुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात डाॅ.स्वामी बोलत होते.
व्यासपीठावर ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर, निवृत्ती महाराज नामदास, चैतन्य महाराज देहूकर , हि वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी तर सोबत विराट हिंदुस्थान संगम महाराष्ट्र चे व स्वामी़चे सहकारी जगदीशजी शेट्टी, विशेष कनोडिया, सत्या सबरवाल, मनोहर शेट्टी, तिरुपती देवस्थान चे श्री.गोविंदहरि व अधिवक्ता धनंजय रानडे उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाच्या सोबत आपण आल्यामुळे निश्चितच आमचा विश्वास वाढला आहे.नक्कीच मंदिर सरकारीकरण रद्द होईल व काॅरीडाॅर चे भूत हि पळवून जाईल असे प्रतिपादन ह.भ.प.वासकर महाराज यांनी केले .तर वारकरी संप्रदायाच्या नगर प्रदक्षिणा या परंपरेला काॅरिडाॅरमुळे धक्का बसत असून नगरच नसेल तर नगरप्रदक्षणा कशाची असा सवाल निवृत्ती महाराज नामदास यांनी उपस्थित केला. तर चैतन्य महाराज देहूकर यांनी श्रीविठ्ठलानेच आम्हाला संविधानची , कायद्याची मदत डाॅ.स्वामी यांच्या रुपाने पाठवली असल्याचे गौरवोद्गार काढले. भागवताचार्य बाळासाहेब बडवे यांनी डाॅ.स्वामीचे पंढरपुर भेटीबद्दल आभार मानत नक्कीच पांडुरंग आपल्या कार्याला यश प्रदान करेल असे प्रतिपादन केले .
जगदीश शेट्टी यांनी डाॅ.स्वामी यांनी हिंदुत्वाचा जागर करत मंदिर सरकारी करणाविरोधात त्यांनी आतापर्यंत उभारलेल्या लढ्याची विस्तृत माहिती दिली.व स्वामीजी पंढरपूरकरांच्या सोबत आहेत हि ग्वाही दिली.
डाॅ.स्वामींनी स्वतः जवळपास तीस मिनिटे केलेल्या जोशपूर्ण भाषणात अनेक विषयांना स्पर्श केला.हिंदू समाज हा एकसंध राहिला पाहिजे.हजारो वर्षांची आक्रमणे हि आम्हाला संपवू शकली नाहीत.व भविष्यात हि संपवू शकणार नाहीत फक्त आपण निडरपणे लढत राहीले पाहिजे.तुम्हीकाॅरीडाॅर बाबत सरकारच्या भुलथापांना, अमिषाला बळी पडू नका मी या ठिकाणी आलो ते तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तुम्ही लढाई अजिबात मागे घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे नक्कीच विजय आपला होईल. मंदिराचे सरकारीकरण व जबरदस्तीने होऊ घातलेला काॅरीडाॅर दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहे.मी लवकरच मोदींनाही या संदर्भात पत्र लिहीणार आहे त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा कायदेशीर मार्गाने आम्ही लढा जिंकणारच आहोत. वाराणसी काॅरीडाॅर मध्येही मोठे उध्वस्थीकरण झालेले आहे. मात्र तेथील नागरिकांची तक्रार आमच्या पर्यंत आली नाही मात्र जागरुक पंढरपुर नागरिकांनी हा विषय आमच्या पर्यंत आणला आणि आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सरकार कोणतेही असो लोकांना विश्वासात घेऊन काम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार जागे होत नसेल तर आम्ही त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करुन देऊ. व लवकरच हे मंदिर सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु.दरम्यान हा काॅरीडाॅर प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे तो डावलून दडपशाहीचा प्रयत्न झाला तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.तुम्ही फक्त ठाम रहा असे परखड मत डाॅ.स्वामी यांनी व्यक्त केले.
डाॅ.स्वामी यांनी ऐतिहासिक होळकर वाडा येथे भेट देऊन पाहणी केली त्याठिकाणी आदित्य फत्तेपुरकर व दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली संतभुमी बचाव समिती व पंढरपुर मधील सर्वपक्षिय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
स्वामींचे स्वागत पुष्पवृष्टी करत पंढरपुर मधील पश्चिमद्वार व्यापारी मंडळी, महाद्वार व्यापारी मंडळी यांनी केले तर कार्यक्रम स्थळी टाळ मृदंगासह श्रीविठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेने स्वागत व विठ्ठल रुक्मिणी वेदपाठशाळा यांनी वेदमंत्रांचा घोष करत स्वागत केले.त्यांचा तुळशीहार व श्रीविठ्ठल रुक्मिणी मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
तर कार्यक्रमास डाॅ.महेश महाराज देहूकर भानुदास महाराज चातुर्मास्ये, रघुनाथ महाराज कबीर,समीहन महाराज आठवले, माधव महाराज बडवे, विठ्ठल महाराज नामदास , नितीन महाराज आदमाने, विष्णु महाराज कबीर,ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, यांच्या सह अनेक वारकरी संप्रदाय महाराज मंडळी, पंढरपूरकर नागरिक, काॅरीडाॅर बाधीत व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, वारकरी संप्रदाय पाईक संघ, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , पंढरपुर तिर्थक्षेत्र बचाव समिती व संतभुमी बचाव समिती यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


